ब्रेकिंग न्यूज

आंतरजिल्हा दुचाकी चोरट्यांची टोळी जेरबंद.

29 चोरीच्या दुचाकीसह दोन आरोपी जेरबंद.स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

बीड | प्रतिनिधीबीड जिल्ह्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांत दुचाकी चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून विविध कंपनीच्या 29 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, त्यांची एकूण किंमत 14 लाख 90 हजार रुपये आहे. या कारवाईमुळे 15 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

बीड जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांचा छडा लावण्यासाठी पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विघ्ने यांच्या विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. दि. 14 जुलै 2026 रोजी हे पथक गेवराई उपविभागातील सिरसदेवी येथे गस्त घालत असताना विना क्रमांकाची मोटारसायकल आढळली. संशय आल्याने चालक गणेश सुदाम बहीर (रा. पांढरवाडी) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, ती मोटारसायकल चोरीची असल्याची कबुली त्याने दिली.

चौकशीत गणेश बहीर याने वैभव बाबासाहेब खेडकर (रा. माहीजळगाव, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) याने चोरी केलेल्या मोटारसायकली विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. प्रत्येक मोटारसायकल विक्रीमागे पाच हजार रुपये देण्याचे ठरल्याची माहितीही त्याने पोलिसांना दिली. त्याच्या ताब्यातून 14 चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.

त्यानंतर पोलिसांनी माहीजळगाव येथे जाऊन वैभव खेडकर याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने बीड, अहिल्यानगर, पुणे शहर, पुणे ग्रामीण, सांगली आणि सोलापूर ग्रामीण या जिल्ह्यांतून एकूण 29 मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यापैकी 14 मोटारसायकली गणेश बहीर याच्याकडे विक्रीसाठी दिल्या होत्या, तर उर्वरित 15 मोटारसायकली त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आल्या.

या कारवाईत दोन्ही आरोपींकडून एकूण 29 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, त्यांची किंमत 14.90 लाख रुपये आहे. तसेच या कारवाईमुळे 15 चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलीस तपासात आरोपी वैभव बाबासाहेब खेडकर हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरुद्ध सन 2022-23 मध्ये जामखेड पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचे सुमारे 30 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या धडक कारवाईमुळे आंतरजिल्हा दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून, बीड पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button