ब्रेकिंग न्यूज

घरफोडी,सोलार प्लांटवरील चोऱ्या करणारी टोळी जेरबंद.

६.७९ लाखांच्या मुद्देमालासह चार चोरटे ताब्यात;स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.

बीड(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात जबरी चोरी,घरफोडी आणि सोलार प्लांटवरील चोऱ्यांच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत सहा जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ६ लाख ७९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल, गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि हत्यारे जप्त करण्यात आली असून दोन आरोपी पोलिसांना धक्का देऊन पसार झाले आहेत.

पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची विशेष पथके कार्यरत आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने व त्यांच्या पथकाने केज उपविभागात तपास सुरू असताना गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली.

पोलिसांना माहिती मिळाली होती की, प्रकाश ऊर्फ गुड्या शाहाजी काळे (रा. मोहा, ता. कळंब, जि. धाराशिव) हा साथीदारांसह पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ (एमएच-१२-एचएफ-४२४५) मधून चोरीचा कॉपर विक्रीसाठी कळंबकडे जाणार आहे. त्यानुसार सापळा रचून कारवाई करण्यात आली.

यावेळी प्रकाश ऊर्फ गुड्या काळे, शहाजी शेषराव पवार, संतोष बारीकराव शिंदे, दिनेश नागनाथ काळे, महेश शिवाजी पवार आणि अशोक हिम्मत शिंदे यांना ताब्यात घेण्यात आले. कारवाईदरम्यान दोन आरोपी पोलिसांना धक्का देऊन फरार झाले.

चौकशीत आरोपींनी धारूर तालुक्यातील आडस येथे आखाड्यात झोपलेल्या व्यक्तीस मारहाण करून १२ शेळ्या चोरी केल्याची कबुली दिली. तसेच केज तालुक्यातील कानडी माळी आणि मस्साजोग येथील सोलार प्लांटमधून अर्थिंग रॉड व कॉपर वायर चोरी, तसेच नेकणूर हद्दीतील येळंब घाट परिसरात घरफोडी केल्याचीही कबुली दिली.

या टोळीकडून धारूर, नेकणूर आणि केज पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले चार गुन्हे उघडकीस आले असून गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ, हत्यारे आणि एकूण ६.७९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, ऑफर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांनच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा बीड पो.नि. शिवाजी बंटेवाड, पोउपनि महेश विघ्ने, पोहवा बप्पासाहेब घोडके, जफर पठाण, दिलीप गित्ते, भागवत शेलार, दिपक खांडेकर,अर्जुन यादव, मपोहवा मुंढे ,पो.अं.अश्वीनकुमार सुरवसे, चापोहवा गणेश मराडे यांनी केलेली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button