दिवसा रेकी,रात्री घरफोडी करणारी टोळी जेरबंद..
पाच लाखांच्या ऐवजासह अट्टल चोर जेरबंद;स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

बीड (प्रतिनिधी)दिवसा गावात रेकी करून रात्री घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सुमारे ₹५ लाखांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत पिंपळनेर व वडवणी पोलीस ठाण्यातील दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
११ जुलै २०२६ रोजी पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरात रात्रीच्या वेळी घरफोडी करून कपाटातील सोन्याचे दागिने चोरीस नेण्यात आले होते. तसेच गावातील इतर महिलांच्या अंगावरील दागिनेही चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार दाखल झाली होती. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे कृष्णा शेषेराव राठोड (वय २५, रा. अंबुनाईक तांडा, गेवराई) याला नाळवंडी तांड्यातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने पाच साथीदारांसह घरफोडी केल्याची कबुली दिली. या टोळीतील इतर पाच आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
आरोपीने वडवणी तालुक्यातील खापरवाडी तांड्यातही घरफोडी करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. त्यामुळे पिंपळनेर आणि वडवणी पोलीस ठाण्यातील एकूण दोन गुन्हे उघडकीस आले.
आरोपीकडून सुमारे तीन तोळे सोने, १० भार चांदी व एकूण सुमारे ₹५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी व जप्त माल पुढील तपासासाठी पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पवार करत आहेत.
सदरील कामगिरी नवनीत काँवत, पोलीस अधीक्षक, बीड, समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक, बीड, वेंकटराम, सहा. पोलीस अधीक्षक, बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, स्थानिक गुन्हे शाखा, बीड, पोलीस उपनिरीक्षक शेखर औटे, महेश विघ्ने, पोलीस हवालदार विकास राठोड, राहुल शिंदे, अंकुश वरपे, गोवींद राख, पोलीस अंमलदार बबन सलगर, आशपाक सय्यद, चालक सिध्देश्वर मांजरे, सुनिल राठोड सर्व नेमणुक स्था.गु.शा यांनी केली आहे.





