
बीड(प्रतिनिधी )बीड शहरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असताना शुक्रवारी (२४ जुलै) सकाळी बार्शी रोडवरील सोमेश्वर मंदिराजवळ नगरपालिकेची मुख्य पाणीपुरवठा जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेल्याची घटना घडली. या प्रकारामुळे आधीच १० ते १५ दिवसांनी पाणी मिळणाऱ्या नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
बीड शहराला सध्या दहा ते पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा होत असून, अपुऱ्या पावसामुळे पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद झाले आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत असतानाच मुख्य जलवाहिनी फुटल्याने सुमारे अर्धा तास मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहत राहिले. त्यामुळे परिसरातील खड्डे पाण्याने भरून गेले आणि रस्त्यावर अक्षरशः नदीसारखा प्रवाह निर्माण झाला.
घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी नगरपालिकेच्या संबंधित विभागाला कळविले. त्यानंतर मुख्य व्हॉल्व बंद करून पाणीपुरवठा थांबविण्यात आला. त्यामुळे पुढील पाण्याचा अपव्यय रोखण्यात आला असला, तरी तोपर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले होते.
एकीकडे शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दिवसेंदिवस संघर्ष करावा लागत आहे, तर दुसरीकडे अशा निष्काळजीपणामुळे मौल्यवान पाण्याचा अपव्यय होत असल्याने नागरिकांनी नगरपालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पाणीटंचाईच्या काळात अशा घटना टाळण्यासाठी जलवाहिन्यांची नियमित तपासणी व तातडीची देखभाल करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.





