ब्रेकिंग न्यूज

बीडमध्ये बनावट नोटरी प्रकरणाचा भांडाफोड.

बनावट नोटरी केल्याने वकिलासह पाच जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बीड (प्रतिनिधी)बीड जिल्हा विविध कारणांनी सातत्याने चर्चेत असताना, बनावट कागदपत्रांच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. मागील आठवड्यात नगर रोड परिसरातील बनावट रजिस्ट्री प्रकरण ताजे असतानाच, आता बनावट नोटरी, खोटे इकरारनामे आणि बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी शेख आबेद शेख हुजूर (वय 60, व्यवसाय – भंगार खरेदी-विक्री) यांनी दिलेल्या तक्रारीवरून FIR क्रमांक 0202/2026 नोंदविण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वासुदेव बापूराव मिसाळ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, नेक्रूर (ता. बीड) येथील गट क्रमांक 41 मधील 0.60 आर जमीन ही फिर्यादी यांच्या मालकीची असून, संबंधित जमिनीबाबत 24 नोव्हेंबर 2025 रोजी व्यवहार सुरू असताना काही व्यक्तींनी संगनमत करून त्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करण्याचा कट रचला. त्यानंतर व्यवहारात अडथळे निर्माण झाले. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान त्यांच्या नावाने बनावट नोटरी, इकरारनामा आणि इतर दस्तऐवज तयार करण्यात आल्याची बाब समोर आली.

फिर्यादींच्या आरोपानुसार, 31 ऑक्टोबर 2025 रोजी 500 रुपयांच्या स्टॅम्पवर खोटा मजकूर छापून बनावट इकरारनामा तयार करण्यात आला. त्यावर त्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून त्या दस्तऐवजाचा वापर करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात शेख मसूद पाशा शेख सुभानी पाशा, मिर्झा रफीक बेग, मारोती राजजी धन्वे, एल. के. वाघमारे तसेच नोटरी ॲडव्होकेट संजय पी. लघाणे यांच्यासह एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 318(4), 336(3), 340(2) व 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. FIR नुसार हा प्रकार 24 नोव्हेंबर 2025 ते 11 जून 2026 या कालावधीत घडला असून, 15 जुलै 2026 रोजी पहाटे 1.17 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी संबंधित कागदपत्रांची पडताळणी, साक्षीदारांचे जबाब आणि इतर पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली असून, तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

बनावट नोटरी आणि रजिस्ट्री प्रकरणांमध्ये वाढ चिंताजनक.

बीड जिल्ह्यात अलिकडच्या काळात बनावट रजिस्ट्री, बनावट नोटरी आणि खोट्या दस्तऐवजांच्या माध्यमातून फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मालमत्तेच्या हक्कांवर गदा येत असून न्यायालयीन व प्रशासकीय यंत्रणेवरही अतिरिक्त ताण निर्माण होत आहे.

दोषींवर कठोर कारवाईची मागणी

जाणीवपूर्वक खोटी नोटरी करून फसवणुकीस हातभार लावणाऱ्या व्यक्तींवर केवळ फौजदारी गुन्हा दाखल करून न थांबता, संबंधित नोटरीचा परवाना तातडीने रद्द करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. अशा प्रकरणांची गांभीर्याने दखल घेऊन जिल्हाधिकारी, नोंदणी विभाग आणि संबंधित सक्षम प्राधिकरणांनी विशेष पडताळणी मोहीम राबवावी, तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी जोर धरत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button