
बीड, प्रतिनिधी : बीड शहरातील बार्शी रोडवरील सोमेश्वर मंदिराजवळील पुलाच्या मधोमध आज, दि. 15 जुलै (बुधवार) रोजी पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास एका स्कॉर्पिओ वाहनाला भीषण आग लागून ती पूर्णपणे जळून खाक झाली. वाहन चालकाने इंजिन मधून दूर निघत असल्याचे दिसताच वाहनाच्या बाहेर आल्याने सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, जळालेल्या स्कॉर्पिओमध्य MH 23 0500 या क्रमांकाची नंबर प्लेट आढळून आली.ही स्कॉर्पिओ एका हॉटेल चालकाची असल्याची देखील चर्चा होती. मात्र ही कार कोणाची याची माहिती मिळाली नाही.आग इतकी भीषण होती की अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत वाहन पूर्णपणे जळून खाक झाले होते. वाहनाच्या इंजिनमधून सकाळी सुमारे 9 वाजेपर्यंत धूर निघत होता. जळालेली स्कॉर्पिओ पाहण्यासाठी नागरिकांनी पुला मध्ये गर्दी केली होती.
ही घटना बार्शी नाका पुलाच्या मधोमध घडल्याने बीड शहरात येणारी व शहराबाहेर जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांना मिळताच तात्काळ वाहतूक पोलीस हारके,कर्मचाऱ्यांना व पेठ बीड अल्ताफ शेख यांना घटनास्थळी पाठवून स्कॉर्पिओ पुलाच्या बाहेर काढून वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, स्कॉर्पिओला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित यंत्रणांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.









