ब्रेकिंग न्यूज

वेश्या व्यवसायावर AHTU चा छापा.

पीडित महिलांची सुटका;दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल.बीड मधील काही लॉजची झाडाझडती घ्यावी.

बीड(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील गेवराई शहरातील अचानक नगर परिसरात राहत्या घरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU) बीडने धडक कारवाई करत तीन पीडित महिलांची सुटका केली. या प्रकरणी दोन महिलांविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, 1956 अंतर्गत गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे यांना ८ जुलै रोजी गुप्त बातमीदारामार्फत अचानक नगर येथे बाहेरील जिल्ह्यातील महिलांना आणून वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती मिळाली. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर पोलीस निरीक्षक निलेश केळे यांच्या मार्गदर्शनाखाली AHTU पथकाने डमी ग्राहक व दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत सापळा रचला.

डमी ग्राहकाने संबंधित ठिकाणी जाऊन संपर्क साधला असता, तेथील महिला एजंटने वेश्या गमनासाठी १,००० रुपयांची मागणी केली. ठरल्याप्रमाणे रक्कम दिल्यानंतर डमी ग्राहकाने इशारा करताच पोलीस पथकाने छापा टाकला.

या कारवाईत नागरबाई लक्ष्मण हातागळे (रा. रामतीर्थ, बीड, सध्या रा. अचानक नगर, गेवराई) हिच्याकडून डमी ग्राहकाने दिलेल्या ५०० रुपयांच्या दोन नोटा जप्त करण्यात आल्या. छाप्यात तीन पीडित महिला आढळून आल्या. त्यापैकी एका महिलेने चौकशीत आपण नांदेड जिल्ह्यातील असून, नागरबाई हातागळे व घरमालकीण शांताबाई सतीश पवार यांनी वेश्या व्यवसायासाठी येथे बोलावल्याची माहिती दिली. ग्राहकाकडून १,००० रुपये घेतले जात असून त्यापैकी ५०० रुपये महिलांना दिले जात असल्याचेही तिने सांगितले.

पोलीसांनी खोलीची झडती घेतली असता २१ वापरात नसलेले निरोध जप्त करण्यात आले. आरोपी महिलांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडून त्यांच्या कमाईवर उदरनिर्वाह केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीनही पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश केळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मीरा रेडेकर, उषा चौरे, महिला पोलीस हवालदार शोभा जाधव, पोलीस हवालदार अशोक शिंदे, प्रदीप येवले, महिला पोलीस शिपाई सविता चव्हाण, भाऊसाहेब कारले, संदीप गर्जे तसेच AHTU बीडच्या पथकाने पार पाडली.

बीड शहरातील काही लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची व अल्पवयीन जोडप्यांना देखील रूम देत असल्याची चर्चा शहरात होत असून अशा लॉजची झाडझडती घेऊन कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button