चार दिवसांतच नाली कोसळली !
रस्ता,नाली बोगस कामाचा भोपळा फुटला;कंट्रक्शनवर गुन्हा दाखल करून काळ्या यादी टाका:सनी वाघमारे

आदेशानंतरही संथ काम; नव्याने बांधलेली नाली पडल्याने गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह, तांत्रिक चौकशीची मागणी
बीड(प्रतिनिधी) बीड शहरातील राजुरी वेस, कटकट पुरा, बुंदेलपुरा,कबाड गल्ली व माळीवेस पोलीस चौकी परिसरातील रस्ता व नाली बांधकामाच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या विकासकामासाठी ₹1,99,99,839 इतका निधी मंजूर करण्यात आला असून 17 एप्रिल रोजी आदेश देखील देण्यात आला आहे. मात्र निधी मंजूर होऊन आदेश निघाल्यानंतरही काम संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
यात भर म्हणजे, अवघ्या चार दिवसांपूर्वी बांधण्यात आलेल्या नालीचा काही भाग कोसळल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, निकृष्ट दर्जाच्या कामाचा भांडाफोड झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या कामाची अधिकृत वर्क ऑर्डर एका कन्ट्रक्शनच्या नावावर असताना प्रत्यक्ष काम दुसरेच कन्स्ट्रक्शन मार्फत केले जात असल्याचा आरोप आहे. संबंधित कंत्राटदाराविरोधात यापूर्वीही विविध विकासकामांबाबत तक्रारी झाल्याचा दावा नागरिकांनी केला असून, तरीही त्याच्याकडे शहरातील अनेक कामे दिली जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
नागरिकांचा आरोप आहे की, रस्ता व नालीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून दर्जेदार काम करणाऱ्या कंपनीकडून काम काढून घेऊन विशिष्ट कंत्राटदाराला लाभ मिळवून देण्यात आला. चार दिवसांतच नाली कोसळल्याने या आरोपांना अधिक बळ मिळाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
याप्रकरणी संबंधित बांधकामाची स्वतंत्र तांत्रिक तपासणी करून दोषी आढळल्यास संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, तसेच त्याला काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, संबंधित विभागाने या प्रकरणी तातडीने खुलासा करून कामाच्या गुणवत्तेची तपासणी करावी, दोषींवर कारवाई करावी आणि उर्वरित विकासकामे पारदर्शक व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.









