DYSP पथकाची धडाकेबाज कारवाई.
२ कोटी ५ लाखाचा मुद्देमाल जप्त;महसूल विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष?

बीड(प्रतिनिधी)बीड शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील इमामपूर शिवारात सुरू असलेल्या अवैध मुरूम उत्खननावर पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) पथकाने धडक कारवाई करत दोन पोकलेन, दोन हायवा जप्त करण्यात आल्या असून तीन हायवा जागेवरून पसार झाल्या आहेत त्या हायवा चा शोध डी वाय एस पी पथक घेत आहे या वाहनांची किंमत जवळपास दोन कोटी पाच लाख रुपये असून या धडक कारवाईमुळे परिसरातील मुरूम माफियांमध्ये खळबळ उडाली असून महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ईमामपूर परिसरात मागील अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात पोकलेन, जेसीबीच्या साहाय्याने डोंगर खोदून अवैधरित्या मुरूम उत्खनन सुरू होते या भागातील बहुतांश गायरान जमिनीतून देखील उत्खनन केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. इमामपूर शिवारात दररोज चार पोकलेने एकाच वेळी १५ ते १८ हायवा मुरूम वाहतूक केला जात होती या उत्खननामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून पर्यावरणाचेही मोठे नुकसान होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, महसूल विभागाचे कार्यालय जवळ असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध उत्खननाकडे संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे तलाठी, मंडळाधिकारी आणि तहसीलदार यांच्या भूमिकेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खनन व वाहतूक होत असताना देखील महसूल चे कर्मचारी अधिकारी हे कारवाई करण्यात का धजावत नव्हते असा देखील प्रश्न आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि पोलीस उपअधीक्षक व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सय्यद, अविनाश सानप, संतोष रणदिवे, कुलदीप औसरमल, शशिकांत ढाकणे आणि विशाल जगताप यांच्या पथकाने ही कारवाई केली. जप्त करण्यात आलेल्या वाहनांबाबत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या कारवाईनंतर अवैध गौण खनिज उत्खननाला संरक्षण कोणाचे होते, महसूल विभागाने यापूर्वी कारवाई का केली नाही आणि शासनाच्या महसुलाचे नुकसान करणाऱ्यांवर पुढे कोणती कठोर कारवाई होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.









