अप्पर पोलीस अधीक्षकपदी समीर शेख यांची नियुक्ती
सचिन पांडकर यांच्या बदलीनंतर राज्य नियंत्रण कक्षातून बीडला वर्णी.

बीड(प्रतिनिधी)बीड जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले अधिकारी सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर आता समीर शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य नियंत्रण कक्षातून त्यांची बीड येथे वर्णी लागल्याने पोलीस प्रशासनात नव्या नेतृत्वाची चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या तब्बल साडेतीन वर्षांपासून बीडमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून काम करताना सचिन पांडकर यांनी अनेक संवेदनशील आणि गंभीर प्रकरणांमध्ये ठोस भूमिका घेतली होती. जिल्ह्यातील जाळपोळ, जातीय तणाव तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणासारख्या घटनांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी प्रभावी कामगिरी केली होती. तसेच मोर्चे आंदोलन देखील शांतपणे हाताळले होते त्यामुळे पोलीस दलातील आश्वासक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती.
बीड जिल्ह्याच्या इतिहासात दीर्घकाळ अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळालेल्या अधिकाऱ्यांमध्ये सचिन पांडकर यांचे नाव विशेष ठरले. त्यांच्या बदलीनंतर बीडच्या रिक्त पदावर कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
अखेर राज्य नियंत्रण कक्षातून समीर शेख यांची बीडच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती निश्चित झाली आहे. शिस्तप्रिय आणि प्रशासनात काटेकोर अधिकारी अशी त्यांची ओळख असून, बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी त्यांच्या कार्यशैलीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.








