ब्रेकिंग न्यूज

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई.

7 लाख 81 हजाराचा मुद्देमाल जप्त;IPS वेंकटरमन यांची दबंग कारवाई.

केज (बीड) प्रतिनिधी : बीड जिल्ह्यात अवैध जुगार व्यवसायाविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत केज पोलीस ठाणे हद्दीतील तिरट जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल 7 लाख 81 हजार 290 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून अवैध धंदे चालविणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

माहितीनुसार, 21 मे रोजी केज उपविभागात कर्तव्यावर असताना सहाय्यक पोलीस अधीक्षक IPS वेंकटरामन यांना गोपनीय माहितीदारामार्फत केज परिसरात काही जण मोठ्या प्रमाणात ‘तिरट’ नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. संबंधितांकडे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि साहित्य असल्याचेही समोर आले होते.

या माहितीची गंभीर दखल घेत सहाय्यक पोलीस अधीक्षकांनी तातडीने विशेष पथकाला कारवाईचे निर्देश दिले. पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकत सहा आरोपींना ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी आणि चारचाकी वाहन असा एकूण 7.81 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटरामन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इनामदार, पोलीस हवालदार क्षीरसागर, मोरे, वंजारे आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने पार पाडली. आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. तपासाच्या कारणास्तव आरोपींची नावे गोपनीय ठेवण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, बीड शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पत्त्यांचे क्लब राजरोस सुरू असणारे अवैध जुगार अड्डे खुलेआम सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. केजमधील धडक कारवाईनंतर आता अशा इतर अड्ड्यांवरही पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. जिल्ह्यातील अवैध जुगार व्यवसायावर प्रभावी आळा बसण्यासाठी सातत्याने मोहीम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button