ब्रेकिंग न्यूज

बीड जिल्ह्यात पुन्हा एक खून !

पैशाच्या वादातून मित्रानेच केला मित्राचा खून.

 बीड( प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील परळी शहरात पैशांच्या किरकोळ वादातून हॉटेल चालक कारभारी नारायण आंधळे यांची मित्रांनीच चाकूने गळा चिरून निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने शहर हादरले आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांपासून परळीत हाणामारी, खून, लूटमार आणि रॉबरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कारभारी आंधळे हे परळीतील पवन हॉटेल चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र, एका किरकोळ आर्थिक वादाने त्यांचा जीव घेतला. मित्रांसोबत दारूच्या नशेत सुरू झालेला वाद थेट खुनापर्यंत पोहोचल्याने सामाजिक वातावरणाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. आरोपींपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी दुसरा संशयित फरार असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे.

परळी शहरात मागील काही महिन्यांत मारामाऱ्या, जीवघेणे हल्ले, चोरी, लुटमार आणि रॉबरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. शहरातील काही भागांमध्ये रात्रीच्या वेळी गुन्हेगारी टोळ्यांचा वावर, दारू पिऊन होणारे वाद आणि किरकोळ कारणांवरून वाढणारी हिंसा ही चिंतेची बाब ठरत आहे. यामुळे व्यापारी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नागरिकांकडून शहरात पोलीस गस्त वाढवण्याची, संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्याची आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. परळी शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक प्रभावी पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे. कारभारी आंधळे हत्याकांड हे केवळ एक प्रकरण नसून, शहरातील बिघडत चाललेल्या कायदा-सुव्यवस्थेचे गंभीर संकेत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.सविस्तर बातमी देण्यात येईल.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button