ऑनलाइन ‘चक्री’ जुगारावर DYSP पथकाचा छापा.
27 हजारांचा मुद्देमाल जप्त;DYSP पथक ॲक्शन मोडवर.

बीड (प्रतिनिधी) उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांनी बीडमध्ये कारवाईचा धडाका सुरू केल्याने अवैध धंदे करणारा एकच खळबळ उडाली आहे.
चार दिवसापूर्वीच पेठ बीड गांधीनगर भागात जवळपास 32 लाखाचा वाळूसाठा जप्त केला होता यामुळे डी वाय एस पी पथक ॲक्शन मोडवर असल्याचे दिसत आहे.
बीड शहरासह जिल्ह्यात ऑनलाइन ‘चक्री’ जुगाराचे जाळे दिवसेंदिवस विस्तारत असून त्याची झळ आता मोठ्या प्रमाणात तरुण वर्गाला बसत आहे. सहज पैसे मिळण्याच्या मोहापोटी अनेक युवक या ऑनलाइन जुगाराकडे आकर्षित होत असून व्यसन, कर्जबाजारीपणा, कौटुंबिक वाद आणि आर्थिक उद्ध्वस्ततेसारखे गंभीर परिणाम समोर येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आज (दि. 20 जुलै 2026) मा. पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार व मा. पोलीस उपअधीक्षक, उपविभाग बीड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली.
गुप्त माहितीच्या आधारे कॅनॉल रोड, जनता डेअरीजवळ छापा टाकण्यात आला. यावेळी गणेश कोंडिबा सावंत (वय 30, रा. कबाड गल्ली, पेठ, बीड) हा संगणकाच्या माध्यमातून ऑनलाइन ‘चक्री’ जुगार चालविताना आढळून आला.
कारवाईदरम्यान पोलिसांनी ₹2,150 रोख रक्कम तसेच HP कंपनीचा संगणक संच (CPU, मॉनिटर व की-बोर्ड) असा एकूण ₹27,150 किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम, 1887 मधील कलम 4 व 5 अन्वये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ऑनलाइन ‘चक्री’ गेमचे दुष्परिणाम :
ऑनलाइन जुगारामध्ये सुरुवातीला लहान रकमेवर मोठा नफा मिळण्याचे आमिष दाखवले जाते. मात्र, बहुतांश खेळाडूंना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. अनेक तरुण कर्ज काढून किंवा घरातील पैसे वापरून जुगार खेळतात. त्यामुळे कर्जबाजारीपणा, मानसिक तणाव, नैराश्य, शिक्षण व रोजगाराकडे दुर्लक्ष, कौटुंबिक कलह आणि काही प्रकरणांमध्ये गुन्हेगारीकडे वळण्याचे प्रकारही वाढत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा जुगारांचे जाळे अधिक वेगाने पसरत असल्याने पालकांनीही आपल्या मुलांच्या ऑनलाइन हालचालींवर लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
ही कारवाई बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख व उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सय्यद तसेच पोलीस अंमलदार सोनवणे, जगताप, सानप, रणदिवे, औसरमल आणि ढाकणे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.









