ब्रेकिंग न्यूज

नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र अवैध !

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा निर्णय;प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश.

बीड(प्रतिनिधी)बीड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये आरक्षित जागेवरून शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आलेले सुरज जयसिंग चुंगडे यांना मोठा धक्का बसला आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बीड यांनी त्यांचा ‘राजपूत भामटा-10 (विमुक्त जाती-अ)’ या जातीचा दावा फेटाळून त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध (Invalid) घोषित केले आहे. तसेच संबंधित जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेशही समितीने दिले आहेत.

समितीच्या निर्णयानुसार, विमुक्त जातीचा दावा सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेला 21 नोव्हेंबर 1961 पूर्वीचा ग्राह्य पुरावा अर्जदाराकडून सादर करण्यात आला नाही. दक्षता पथकाच्या चौकशीत अर्जदाराचे वडील व इतर नातेवाईकांच्या जुन्या शालेय नोंदी मध्ये जातीचा उल्लेख आढळून आला नसल्याने जिल्हा जात पडताळणी समितीने यावर आक्षेप घेत निकाल दिला.

याशिवाय, अर्जदाराने सादर केलेले नातेवाईकाचे जातवैधता प्रमाणपत्रही रक्ताचे नाते सिद्ध करणारी प्रमाणित वंशावळ नसल्याने समितीने ग्राह्य धरले नाही.

उपलब्ध कागदपत्रे, दक्षता पथकाचा अहवाल आणि संबंधित कायदेशीर तरतुदींचा विचार करून समितीने 11 डिसेंबर 2007 रोजी निर्गमित करण्यात आलेले जात प्रमाणपत्र अवैध घोषित करत ते जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

पेठ बीड परिसराचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे जेष्ठ नेते जयसिंह  चुंगडे यांचे पुत्र नगरसेवक सुरज चुंगडे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने बीडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून शिवसेना शिंदे गट व चुंगडे यांना हा धक्का मानला जात आहे या निर्णयानंतर त्यांच्या नगरसेवकपदाबाबत पुढील कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button