गुटख्याच्या साठ्यावर पोलिसांचा छापा;पेठ बीड गुटख्याचे “हॉटस्पॉट”?
१लाख ४ हजाराचा गुटखा जप्त;गुटखा माफियाला स्थानिक गुन्हे शाखेचा दणका.

बीड(प्रतिनिधी) गुटखा व तंबाखूजन्य पदार्थावर राज्य सरकारने बंदी घातली असताना देखील बीड शहर व जिल्ह्यात गुटखा राजरोज विक्री व वाहतूक केले जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पेठ बीड पोलिसांनी गेल्या आठ दिवसात गुटख्यावर दोन कारवाया करत लाखोचा गुटखा व वाहने जप्त करुन गुटखा माफिया पर गुन्हा दाखल करण्यात आला होता तरीही याच पोलीस ठाणे हद्दीतच गुटखा विक्री होत असल्याने पेठ बीड हे गुटक्याचे “हॉटस्पॉट” बनले आहे का? असा सवाल उपस्थित होत असून गुटखा माफियाचे “पाळेमुळे”पोलिसांनी उखडून टाकावे.
बीड जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत आणखी एक मोठी कारवाई करत पेठ पोलीस ठाणे हद्दीतील मोहम्मदिया कॉलनी, मोमीनपुरा परिसरातून ₹1,04,840 किमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला. या कारवाईदरम्यान आरोपी पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पळून गेला.
दिनांक 15 जुलै रोजी अवैध धंद्यांवर कारवाईसाठी पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहितीच्या आधारे सायंकाळी 6.15 वाजता मोहम्मदिया कॉलनी येथे एका घरात गुटखा विक्रीसाठी ठेवली असल्याची माहिती मिळाली असता त्या ठिकाणी छापा टाकण्यात आला.
छाप्यावेळी संशयित शहबाज अब्दुलरजाक मोमीन हा मोमीनपुरा भागात गुटख्याच्या दोन गोण्या घेऊन उभा असल्याचे दिसून आले. मात्र पोलिसांना पाहताच त्याने गोण्या जागीच टाकून घराच्या मागील दरवाजातून पलायन केले. पंचांसमक्ष गोण्यांची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा-1000, विमल पान मसाला, के.एन.-01 जाफराणी जर्दा, रॉयल 220 तंबाखू, रॉयली 717 टोबॅको आणि V-1 टोबॅको आदी विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आला.
पोलिसांनी एकूण ₹1,04,840 किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून आवश्यक नमुने रासायनिक विश्लेषणासाठी राखून ठेवण्यात आले आहेत. उर्वरित मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला.
या प्रकरणी शहबाज अब्दुलरजाक मोमीन, रा. मोहम्मदिया कॉलनी, मोमीनपुरा, बीड याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 123, 274 व 275 अन्वये पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम त्यांच्या मार्गदर्शनाखाली
स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड आदेशाने पोलीस उपनिरीक्षक शेखर औटी,पो. ह.अशोक दुबाले,पो.ह.गोविंद राख,अंकुश वरपे,महिला पो. ह.स्वाती मुंडे,तसेच पोलीस अंमलदार बबन सलगर, मनोज परजणे,पो.अं.अशफाक अन्सार, सुनील राठोड यांनी ही धडक कारवाई यशस्वी केली.
अवैध धंद्यासह गुटखा विक्री व साठेबाजीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची मोहीम सुरू असून अशा बेकायदेशीर धंद्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखा पोनि शिवाजी बंटेवाड यांनी सांगितले.





