भेसळीच्या दुधाचा काळाबाजार करणाऱ्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई.
पॅकिंग दूध कॅनमध्ये मिसळून दूधवाले करत होते विक्री;भेसळखोरांवर कठोर कारवाईचा इशारा.

बीड(प्रतिनिधी) अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती झाल्यापासून राज्यभर भेसळखोरावर कारवायाचा धडाका सुरू झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी दुधात तसेच इतर अन्नपदार्थात भेसळ करणारा वर मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या जात आहेत.
बीड शहरात पॅकिंग दूध कॅनमधील दुधात मिसळून नागरिकांना विक्री करणाऱ्या दूध विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे.
मागील आठवड्यात बार्शी नाका,परळी रोड, कोल्हारवाडी फाटा,खजाना विहीर परिसरातील काही दूध विक्रेते विनापरवाना बंद पॅकेटमधील दूध फोडून ते कॅनमधील दुधात मिसळत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन खडबडून जागे झाले.
व्हायरल झालेल्या व्हिडिओंमुळे काही दूध विक्रेते पॅकिंग दुधाचा वापर करून ग्राहकांची दिशाभूल करत असल्याचे स्पष्ट झाले होते.
काही बंद पुढयावर पॅकिंगवरील कंपनीचे नाव,उत्पादन दिनांक, कालबाह्यता (एक्सपायरी) दिनांक तसेच फॅटची माहिती नसल्याची बाबही समोर आली. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची चर्चा होती.
बीड /परळी रोडवरील मोची पिंपळगाव,कोल्हारवाडी फाटा आणि आहेरवडगाव परिसरात सकाळी ६ ते ८ या वेळेत काही दूध विक्रेते पॅकिंग दूध कॅनमध्ये मिसळत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत बीड अन्न व औषध अधिकाऱ्यांनी दिनांक १८ जुलै शनिवार रोजी सकाळी सहा वाजता परळी रोडवरील मोची पिंपळगाव येथे कारवाई करत दोन विक्रेत्याकडे दूध विक्री बाबत परवाना विचारला असता त्यांच्याकडे दूध पुढे विकायचा परवाना किंवा बिल नसल्याने सुमारे २०० दूध पिशव्या नष्ट केल्या. यावेळी अनेक भेसळ करणारे दूध वाल्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला.
या ठिकाणच्या दुधाचे नमुने (सॅम्पल) तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या कारवाईनंतर संबंधित परिसरातील दूध विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. या कारवाईची माहिती बीड शहरातील इतर भेसळखोरांना मिळतात त्यांनी तात्काळ अशा विनापरवाना बंद पॅकेट मधील दूध विक्री बंद झाली.
ही कारवाई FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांनच्या पथकाने केली.
दूध किंवा कोणत्याही अन्नपदार्थात भेसळ करणे हा गंभीर आणि दंडनीय गुन्हा आहे. अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल. दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार गुन्हे दाखल करून परवाने रद्द करण्यासह आवश्यक ती कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड खेळणाऱ्या कोणचीही गय केली जाणार नाही,तसेच भेसळखोरावर कठोर कायदेशीर कारवाईचा करणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला.









