वाळू माफियांना गेवराई पोलिसांचा दणका;24 तासांत दोन कारवाया.
11.82 लाखांचा मुद्देमाल जप्त;गेवराई पोलीस ॲक्शन मोडवर.

बीड(प्रतिनिधी)गेवराई अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात गेवराई पोलीसांनी धडक मोहीम सुरू ठेवत अवघ्या 24 तासांत दोन स्वतंत्र कारवाया करून 11 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली असून गेवराई पोलीस अवैध धंद्यांविरोधात पूर्णपणे ॲक्शन मोडवर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याच्या आदेशानुसार गेवराई पोलीसांनी विशेष पथक तयार करून ही मोहीम राबवली. दिनांक 16 जुलै 2026 रोजी पहाटे साडेबारा वाजण्याच्या सुमारास जातेगाव रोडवरील कुलकर्णी हॉस्पिटलजवळ विनानंबरचा अशोक लेलँड बडा दोस्त पिकअप अवैधरित्या वाळू वाहतूक करताना पकडण्यात आला. या कारवाईत वाहनासह वाळू असा 6 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोउपनि. राम खोत करत आहेत.
त्यानंतर त्याच दिवशी सकाळी 9.15 वाजता गोंदी (खु.) येथे दुसऱ्या कारवाईत विनानंबरचा अर्जुन महिंद्रा ट्रॅक्टर व डंपिंग ट्रॉली अवैध वाळू वाहतूक करताना आढळून आला. या कारवाईत 5 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोह/954 अशोक हुंबर्डे करत आहेत.
विशेष म्हणजे 13 जुलै रोजीही गेवराई पोलीसांनी अवैध वाळू वाहतूक करणारा भारत बेंझ हायवा आणि अशोक लेलँड वाहन जप्त करून सुमारे 27 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत पुन्हा सलग कारवाया करून अवैध वाळू वाहतुकीवर मोठा आळा घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गेवराई पोलीस आता वाळू माफियांविरोधात सातत्याने ॲक्शन मोडवर असल्याची चर्चा सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके आणि पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. राम खोत, हिमांशू नागरे, कल्याण राठोड, अशोक हुंबर्डे, गोरक्ष डोके, धीरज खांडेकर व चालक इसाक शेख यांच्या पथकाने केली.









