पालखी सोहळ्यात दागिने चोरणारी टोळी जेरबंद.
सहा लाखाचे दागिने हस्तगत;तीन आरोपी ताब्यात.स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.

बीड(प्रतिनिधी)अंबाजोगाई येथे गजानन महाराज पालखी सोहळ्यादरम्यान भाविकांच्या गर्दीचा फायदा घेत करण्यात आलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कारवाईत तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून सुमारे ५९ ग्रॅम वजनाचे जवळपास सहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे अंबाजोगाई शहरातील दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून चेन स्नॅचिंग व गर्दीतील सोन्याचे दागिने चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने महिला व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, दि. १० जुलै २०२६ रोजी अंबाजोगाई येथे गजानन महाराज पालखी सोहळ्यानिमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असताना दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गळ्यातील सोन्याची चैन व सोन्याचे मिनी गंठण चोरीला गेले होते. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९०/२०२६ व २९३/२०२६ असे भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या गुन्ह्यांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने करून आरोपींचा शोध घेतला. तपासादरम्यान विशाल संजय हातागळे (वय २८, रा. गांधीनगर, नाळवंडी रोड, बीड) व दत्ता विजय गायकवाड (वय २६, रा. गांधीनगर, नाळवंडी रोड, बीड) यांनी गर्दीचा फायदा घेऊन ४८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरल्याचे निष्पन्न झाले. तसेच अशोक बबन जाधव (वय २९, रा. शास्त्रीनगर, नाळवंडी रोड, बीड) याने ११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण चोरल्याचे उघड झाले. तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले सर्व दागिने जप्त करण्यात आले.
या कारवाईत एकूण ५९ ग्रॅम वजनाचे जवळपास सहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून नागरिकांनी या कामगिरीचे स्वागत केले आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहायक पोलीस अधीक्षक ऋषीकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार मारोती कांबळे, रामचंद्र केकान, सचिन सानप, सोमनाथ गायकवाड, गोविंद भताने, विकास राठोड, पोलीस अंमलदार सचिन आंधळे, चालक अतुल हराळे (स्थानिक गुन्हे शाखा) तसेच पांडुरंग काळे (अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे) यांनी सहभाग घेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.









