DYSP वेंकटराम यांची वाळू साठ्यावर धडक कारवाई.
32 लाखांचा अवैध वाळूसाठा व वाळूत लपवून ठेवलेला गांजा जप्त.

बीड(प्रतिनिधी)बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीतील गांधीनगर परिसरात अवैध वाळूसाठ्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) वेंकटराम यांनी स्वतः धडक कारवाई करत सुमारे 32 लाख रुपयांचा वाळूसाठा जप्त केला. याच कारवाईदरम्यान वाळूच्या ढिगाऱ्यामध्ये बादलीत लपवून ठेवलेला सुमारे 2 किलो गांजा देखील हस्तगत करण्यात आला. या कारवाईमुळे अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे डीवायएसपी वेंकटराम यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन छापा टाकला. तपासणीदरम्यान सुमारे 200 ते 300 ब्रास अवैध वाळूसाठा आढळून आला. या वाळूसाठ्याची अंदाजित किंमत 32 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. तपासादरम्यान वाळूच्या ढिगाऱ्यात बादलीमध्ये लपवून ठेवलेला सुमारे 2 किलो गांजा देखील जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, डीवायएसपी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सय्यद, पोलीस अंमलदार सोनवणे, सानप, रणदिवे, औसरमल, ढाकणे, जगताप तसेच पेठ बीड पोलीस ठाण्याचे कर्मचारी सहभागी होते.
कारवाईनंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावण्यात आले.बीड तहसीलदार चंद्रकांत शेळके, मंडळ अधिकारी, तलाठी तांदळे व इतर महसूल कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत अवैध वाळूसाठ्याचा पंचनामा करण्यात आला.
या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, संबंधितांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
मागील एक महिन्यापासून डीवायएसपी वेंकटराम यांच्या पथकाने बीड शहर तसेच तालुक्यात अवैध धंद्यावर कारवायाचा धडाका लावल्याने दोन नंबर आल्यास खळबळ उडाली असून यापुढे देखील अवैध धंदे करणारावर कारवाया सुरूच राहणार असल्याची माहिती दिली.





