शिक्षक सेवकाचा संशयास्पद मृत्यू;अंबाजोगाईत खळबळ.
अपघात की घातपात? परिसरात विविध चर्चांना उधाण.

अंबाजोगाई( प्रतिनिधी)अंबाजोगाई शहरातील तथागत चौक परिसरात सोमवारी (दि. १३) पहाटे एका ४१ वर्षीय शिक्षक सेवकाचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अलिकडच्या काही दिवसांत तालुक्यात घडलेल्या गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
विवेक करपे (वय ४१, रा. जवळबन, ता. केज) असे मृताचे नाव असून ते वडवणी तालुक्यातील खडकी देवळा येथील एका खासगी शाळेत शिक्षक सेवक म्हणून कार्यरत होते. ते पत्नी, मुलगा आणि मुलीसह केज येथे वास्तव्यास होते.
सोमवारी सकाळी तथागत चौकात त्यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तपासादरम्यान त्यांच्या खिशात ट्रॅव्हल्सचे तिकीट आढळून आल्याने ते प्रवास करून अंबाजोगाईत आले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा अपघात आहे की घातपात, याबाबत परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून अनेक नागरिकांकडून घातपाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि, याबाबत अद्याप पोलिसांकडून कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, अंबाजोगाई तालुक्यात सातत्याने घडणाऱ्या गंभीर घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.









