धनगर आरक्षणासाठी शेतात सरणावर बसून उपोषण.
धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली लागेपर्यंत उठणार नाही...सतीश देवगुंडे

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील सोन्नाथडी गावात धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी आज दिनांक नऊ जुलै गुरुवार रोजी एक अनोखे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. गावातील सतीश मारुतीराव देवगुंडे यांनी आपल्या शेतात प्रतीकात्मक स्वरूपात लाकडे रचून सरण उभारले असून, त्यावर घोंगडी अंथरून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
उपोषणादरम्यान त्यांनी “देवा भाऊ, क्या हुआ तेरा वादा?” अशी घोषणा देत सरकारकडे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाचा लाभ मिळावा, ही प्रमुख मागणी त्यांनी केली आहे.
जोपर्यंत धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा प्रश्न निकाली निघत नाही, तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार सतीश देवगुंडे यांनी व्यक्त केला. राज्य सरकारने या प्रश्नावर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन धनगर समाजाला न्याय द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या अनोख्या आंदोलनाची परिसरात चर्चा सुरू असून, धनगर समाजातील नागरिकांनीही या उपोषणाला पाठिंबा दर्शविल्याचे सांगितले जात आहे.









