ब्रेकिंग न्यूज

पेठ बीड पोलिसांचा गुटखा माफियाला पुन्हा दणका.

10.57 लाखांचा प्रतिबंधित गुटखा व दोन वाहने जप्त.दोन आरोपी ताब्यात,चार दिवसांत दुसरी मोठी कारवाई.

बीड(प्रतिनिधी)पेठ बीड पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा वाहतुकीविरोधात सलग दुसऱ्यांदा मोठी कारवाई करत तब्बल 10 लाख 57 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुटखा माफियात मोठी खळबळ उडाली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा क्रमांक 226/2026 हा भारतीय न्याय संहितेच्या कलम 123, 223, 274, 275, 3(5) अन्वये दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मोसीन सलाउद्दिन शेख (वय 34, रा. मोमीनपुरा, पेठ बीड) आणि अरबाज मुसा शेख (वय 22, मूळ रा. उफळी, ता. वडवणी, सध्या युनूस पार्क, तेलगाव रोड, बीड) यांना आरोपी करण्यात आले आहे.

दि. 9 जुलै 2026 गुरुवार रोजी रात्री सुमारे 9.30 वाजण्याच्या सुमारास बीड-बार्शी रोडवरील लॉ कॉलेजसमोर पेठ बीड पोलिसांच्या डीबी पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. आरोपी त्यांच्या ताब्यातील स्विफ्ट कार व इनोव्हा वाहनातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला हिरा पान मसाला, रॉयल तंबाखू व इतर गुटखा विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

कारवाईदरम्यान पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा, दोन वाहने असा एकूण 10,57,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस हवालदार नितीन माणिकराव राठोड यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मन्सूर शहा यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख व उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश केळे यांच्या नेतृत्वाखाली api उबाळे,psi मन्सूर शहा,पोलीस हवालदार नितीन राठोड,पो.अं.अल्ताफ शेख,मोटे,औदुंबर गिरी,पांडुरंग परझने तसेच चालक नवले यांनी सहभाग घेतला.

विशेष म्हणजे, अवघ्या चार दिवसांपूर्वीही पेठ बीड पोलिसांनी बार्शी नाका परिसरात गुटखा वाहतूक करणारी कार पकडली होती. सलग दुसऱ्यांदा झालेल्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील गुटखा तस्करांचे धाबे दणाणले असून, अवैध गुटखा व्यापाराविरोधातील पोलिसांची मोहीम अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button