ब्रेकिंग न्यूज

सराईत गुन्हेगार महिला जिल्ह्यातून सहा महिने हद्दपार !

महिलेवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल;बीड शहरात चर्चांना उधाण.

बीड( प्रतिनिधी)बीड शहरातील मोमिनपुरा, पेठ बीड येथील रहिवासी शेख नाजीया शेख पाशा (वय ३५) यांच्याविरुद्ध बीड उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाने मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६ (१) (अ) अंतर्गत जिल्हा हद्दपारीची कारवाई केली आहे. या आदेशानुसार संबंधित महिलेला सहा महिन्यांसाठी बीड जिल्ह्याच्या हद्दीबाहेर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक बीड यांच्या प्रस्तावानंतर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. संबंधित महिलेविरुद्ध गंभीर स्वरूपाचे विविध गुन्हे दाखल असून तिच्या हालचालींमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचा उल्लेख आदेशात करण्यात आला आहे.

जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, हद्दपारीच्या कालावधीत उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय संबंधित महिलेला बीड जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही. आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. तसेच वास्तव्याचा पत्ता बदलल्यास जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती देणे बंधनकारक राहणार आहे.

मतदानाचा हक्क बजावणे किंवा न्यायालयीन सुनावणीसाठी आवश्यक असल्यास पूर्वपरवानगी घेऊन जिल्ह्यात प्रवेश करता येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. हा आदेश २० मे २०२६ रोजी बीड उपविभागीय दंडाधिकारी यांनी जारी केला. सदरील महिलेवर बीड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून ते न्यायप्रविष्ठ आहेत.

महिला आरोपीवर हद्दपारीची कारवाई झाल्याने बीड शहरात चर्चांना उधाण आले असून, अशा प्रकारची कठोर प्रशासकीय कारवाई महिला व्यक्तीवर झाल्याने प्रकरणाने विशेष लक्ष वेधून घेतले आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button