मुकादमाला बेदम मारहाण.
पैसे मागितल्याच्या वादातून मारहाण,रोख रक्कम व सोन्याची अंगठी लंपास.

बीड (प्रतिनिधी)बीड तालुक्यातील मौजवाडी येथे दिलीप जगताप या मुकादमावर दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने लोखंडी गज व कोयत्याच्या धाकाने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात जगताप यांनी काही जणांविरोधात गंभीर आरोप करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
माहितीनुसार, दिलीप जगताप यांनी 2017 साली गावातील एका कोयत्याला (ऊसतोड कामगार) सुमारे 2 लाख 20 हजार रुपयांची उचल दिली होती. त्यातील उर्वरित 67 हजार रुपये परत देण्याची मागणी जगताप यांनी केल्याने वाद निर्माण झाल्याचा आरोप आहे.
दरम्यान, मौजवाडी गावात रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास 10 ते 15 जणांच्या टोळक्याने ग्रुप करून जगताप यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात लोखंडी गजांचा वापर करून मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच, मारहाणीनंतर जगताप यांच्या खिशातील 2 लाख 30 हजार रुपये रोख रक्कम आणि सुमारे 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी घेऊन गेल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. गावातीलच काही दहा ते पंधरा जनाच्या टोळक्याने मारहाण केल्याचा आरोप दिलीप जगताप यांनी केला आहे.
जखमी दिलीप जगताप यांच्यावर सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून,अद्याप गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.






