सुट्टीत आलेल्या मामाच्या १० वर्षीय मुलीवर अत्याचार- केज तालुक्यातील आडवड्यात ३री घटना
आठडीवसातील ३री घटना.


*सुटीत आजोळी आलेल्या तरुणाने केला मामाच्या दहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; केज तालुक्यात महिला अत्याचाराची आठवड्यातील तिसरी घटना*
अंबाजोगाई-प्रतिनिधी:-
:तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला आलेल्या एका २९ वर्षीय नराधम भाच्याने आपल्याच १० वर्षांच्या अल्पवयीन चुलत बहिणीवर (मामाच्या मुलीवर) अत्याचार केला. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला इटकूर येथून बेड्या ठोकल्या आहेत. या नराधमावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
सविस्तर वृत्त असे की, पीडित मुलीचे आई-वडील रात्रीच्या वेळी शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. घरात मुलगी एकटीच असल्याचे पाहून आरोपीने या परिस्थितीचा गैरफायदा घेतला आणि हे घृणास्पद कृत्य केले. कृत्य केल्यानंतर आरोपीने मामा घरी येण्यापूर्वीच तिथून पळ काढला. मात्र, पालकांनी घरी परतल्यानंतर पीडितेने घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. या घटनेने हादरलेल्या पालकांनी तात्काळ युसुफ वडगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने शोधमोहीम राबवली आणि आरोपीला इटकूर परिसरातून ताब्यात घेतले.
विशेष म्हणजे, युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या तीन दिवसांतील ही तिसरी मोठी गुन्हेगारी घटना आहे. यापूर्वी एका आजोबांनी नातीवर केलेले अत्याचार आणि अंगणवाडी सेविकेवर गुंगीचे औषध देऊन झालेल्या अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच या नवीन प्रकारामुळे महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या सर्व प्रकरणांचा सखोल तपास करत असून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.









