सुविधा केंद्रात नोंदणी व्हेरिफायसाठी पैशांची मागणी;कामगारांची लेखी तक्रार
कामगार कार्यालयाचा"कारनामा"चव्हाट्यावर.हजारो बोगस कामगारांची नोंद कोणाच्या आशीर्वादाने?

बीड(प्रतिनिधी) बीड जिल्हा कामगार कार्यालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून यापूर्वी देखील या कार्यालयाच्या बाबतीत अनेक तक्रारी आल्या होत्या परंतु अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना पाठीशी घातल्याने पुढे कारवाई थंडावली होती.
पाटोदा येथील तालुका सुविधा केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांकडून कामगारांकडून नोंदणी व्हेरिफाय करण्यासाठी पैसे उकळले जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. याबाबत बांगर (रा. ता. पाटोदा, जि. बीड) यांनी सरकारी कामगार अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, तालुका सुविधा केंद्रातील शिपाई मनोज सोमवंशी यांच्या माध्यमातून इंचार्ज फरहान पठाण तसेच डाटा एन्ट्री ऑपरेटर जयराम जाधव, आकाश गवळी आणि सचिन शेजवाळ हे सर्व कर्मचारी संगनमताने कामगारांकडून पैसे घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नोंदणी फॉर्म व्हेरिफाय करण्यासाठी प्रत्येकी ५०० रुपये द्यावे लागतात, तसेच हे पैसे सरकारी अधिकारी सुधाकर कोणाळे यांना द्यावे लागतात, असे सांगून कामगारांची दिशाभूल केली जात असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
तक्रारदार बांगर यांनी स्वतः नोंदणी व्हेरिफायसाठी गेल्यानंतर त्यांच्याकडूनही पैशांची मागणी करण्यात आली. त्यांनी ऑनलाइन पैसे भरल्यानंतरच त्यांचा फॉर्म मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. या प्रकारामुळे अनेक कामगार आर्थिक शोषणाला बळी पडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात ऑनलाइन व्यवहाराचे पुरावेही तक्रार अर्जासोबत जोडण्यात आले असून संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे. या गंभीर आरोपांमुळे तालुका सुविधा केंद्राच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून कामगार विभागाने याची तातडीने दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे.कामगार अधिकारी कोणाळे जबाबदार की कंत्राटी कर्मचारी ?
जिल्हा कामगार अधिकारी असलेले कोणाळे हे आपल्या कामांमध्ये बाकीच्यांना हस्तक्षेप करू देत नाहीत असे म्हटले जाते. मात्र बऱ्याच तालुक्यातील कंत्राटी कर्मचारी आणि काही पर्मनंट अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा कोणाले आहे यांचे नाव पुढे करून, पैसे मागत असल्याची माहिती आहे. तुमचे काम करून देतो मात्र आमच्या साहेबांना आम्हाला पैसे द्यावे लागतात, यामुळे पैसे दिले शिवाय काम होणार नाही अशी बतावणी हे कर्मचारी करीत असल्याचे सांगण्यात येते.
यामुळे असा प्रश्न निर्माण झाला आहे की कामगार अधिकारी कोणाळे यांचे नाव पुढे करून दुसरेच अधिकारी विशेषता कंत्राटी कर्मचारी स्वतःचा फायदा करून घेत आहेत का. ? कामगार अधिकारी असलेले कोणाळे यांनी सुद्धा याबाबत स्पष्टीकरण देण्याची गरज आहे.










