ब्रेकिंग न्यूज

डॉ.आंबेडकर जयंती उत्सव मिरवणूकीतील गैरसोय प्रकरणी नगराध्यक्षांनी दिले चौकशीचे आदेश.

पगारे,माने,किरण देशमुख यांना बजावली नोटीस;दोषींवर होणार निलंबनाची कारवाई.

बीड (प्रतिनिधी) – भारतीय राज्य घटनेेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव मिरवणूकीदरम्यान झालेल्या गैरसोयी प्रकरणी नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. आज दुपारी नगर पालिकेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून स्वच्छता विभागातील गणेश पगारे, पाणी पुरवठ्याचे माने आणि बांधकाम विभागातील इंजि.किरण देशमुख यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांनी सांगितले.

बीड नगर पालिकेत आज दुपारी झालेल्या बैठकीस नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे, उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्यासह स्वच्छता सभापती शेख निजाम, नगरसेवक शेख बिलाल, रंजित बनसोडे, भैय्या मोरे, प्रमोद शिंदे, मनोज गोडसे आदिंची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये जयंती उत्सव मिरवणूकीदरम्यान झालेल्या गैरसोयीबद्दल चर्चा करण्यात आली. जयंती उत्सवाच्या अनुषंगाने संबंधित विभागाने आपली जबाबदारी चोखपणे पार पाडणे आवश्यक होते. मात्र सदरील प्रकरणातून संबंधित विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांचा अक्षम्य दुर्लक्षपणा दिसुन येत असल्याने या प्रकरणी नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर सदरील प्रकरणाचे गांभीर्य पाहता स्वच्छता विभागातील गणेश पगारे, पाणी पुरवठा विभागातील माने आणि बांधकाम विभागाचे इंजि.किरण देशमुख यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. चौकशीमध्ये जेे कोणी अधिकारी, कर्मचारी दोषी आढळतील त्यांच्याविरूध्द थेट निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button