डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या न.प.अधिकाऱ्यांना निलंबित करा:पप्पू कागदे
न.प.अभियंता किरण देशमुख व प्रमोद मानेला तात्काळ निलंबन करा अन्यथा आंदोलन.

बीड(प्रतिनिधी) बीड नगरपालिकेचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला असून जयंती पूर्व नियोजन फोल ठरल्याने आंबेडकर अनुयायी मध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बीड भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणूक मार्गावरती घाण पाणी सोडून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या व रस्त्यावर चर,खडी टाकून अनेक आंबेडकरी अनुयायांना जखमी करण्यास कारणीभूत असलेल्या बीड नगर परिषद बांधकाम अभियंता किरण देशमुख व पाणीपुरवठा अभियंता प्रमोद माने यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. अशी मागणी युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष तथा रिपाइंचे बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना निवेदन देऊन केली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणूक मार्गावरती बारीक चर,खडी टाकून घाण पाणी सोडल्यामुळे खडीवरून घसरून अनेक महिला भगिनी, पुरुष व रिपाइंचे बीड शहराध्यक्ष अविनाश जोगदंड जबर जखमी झाले आहेत. ही बाब अत्यंत खेदजनक असून जयंती उत्सवाला गालबोट लावणारी आहे.
आंबेडकरांच्या मिरवणुकी दरम्यान रस्त्यावर घाण पाणी सोडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या व रस्त्यावर बारीक चर,खडी टाकून आंबेडकरी अनुयायांना जखमी करण्यास कारणीभूत असलेल्या बांधकाम अभियंता किरण देशमुख, पाणी पुरवठा अभियंता प्रमोद माने व कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. नसता बीड शहर रिपाइंच्या वतीने बीड नगर परिषदवर सोमवार दि. 20 एप्रिल 2026 रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, राजू जोगदंड, प्रभाकर चांदणे, संभाजी गायकवाड, कपिल साळवे, विष्णू जोगदंड, तुषार जाधव, सिद्धिक फारोखी, भैय्यासाहेब वाघमारे आदींनी केले.









