बस स्थानकावरील महिला चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश.
महिलांच्या पर्स,मोबाईल,दागिने चोरणाऱ्या दोन महिला अटकेत;शिवाजी नगर पोलिसांची कारवाई.

बीड (प्रतिनिधी)बीड बस स्थानक परिसरात मागील काही महिन्यांपासून महिला प्रवाशांच्या पर्स, मोबाईल, दागिने चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असताना शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत महिला चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. गर्दीचा फायदा घेत महिलांना लक्ष्य करणाऱ्या दोन महिला आरोपींना रंगेहात पकडण्यात पोलिसांना यश आले असून या कारवाईमुळे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १२ जून २०२६ रोजी दुपारी दीड ते सव्वादोन वाजण्याच्या सुमारास बीड बस स्थानकावर एक महिला प्रवासी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत दोन संशयित महिलांनी त्यांना धक्का-बुक्की करण्यास सुरुवात केली. याच गोंधळात फिर्यादीच्या हातातील खाकी रंगाची पर्स हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र फिर्यादीने तात्काळ आरडाओरडा केल्याने बस स्थानकावर कर्तव्यावर असलेले पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखत दोन्ही महिलांना जागीच पकडले.
या कारवाईदरम्यान आरोपींकडून चोरीची रोकड व पर्स हस्तगत करण्यात आली असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १५२/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गर्दीचा फायदा घेऊन महिलांनाच लक्ष्य
तपासादरम्यान या महिला चोरट्या सामान्य वेशात वावरत असल्याचे समोर आले आहे. बसमध्ये चढताना किंवा गर्दीच्या ठिकाणी महिलांचे लक्ष विचलित करून बॅगची चैन उघडणे, पर्स हिसकावणे किंवा मौल्यवान वस्तूंवर हात साफ करणे, अशी त्यांची कार्यपद्धती असल्याचे पोलिसांनी सांगितले. “महिला चोर असू शकत नाहीत” या सर्वसामान्य समजुतीचा फायदा घेत ही टोळी चोरी करत असल्याची माहिती समोर आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,प्रभारी पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शिवाजीनगर डीबी पथकातील एएसआय संतोष राऊत, पोहेकॉ रवींद्र आघाव, पोना ज्ञानेश्वर मराडे, पोअ सचिन आगलावे, अनंत गिरी, बाळू रहाडे, दिलीप राठोड, अशोक राडकर, शुभम सोनवणे आणि अनिल घटमळ यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
याशिवाय महिला पोलीस जमादार मीरा पाटील यांनी आरोपींचा छडा लावण्यात आणि कारवाई यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रवाशांना पोलिसांचे आवाहन
बस स्थानक परिसरात प्रवास करताना मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात, गर्दीत अनोळखी व्यक्तींवर लक्ष ठेवावे, बॅग स्वतःच्या ताब्यात ठेवावी तसेच संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवाजीनगर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, बीड बस स्थानक परिसरातील चोरीच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी शिवाजीनगर पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली असून अशा चोरट्यांविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.







