दुचाकी चोराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
सहा दुचाकीसह चोर ताब्यात;स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

बीड : स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) बीडच्या पथकाने वाहनचोरी प्रकरणात मोठी कारवाई करत अंबाजोगाई शहरातील दोन आणि परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील एका गुन्ह्याचा उलगडा केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण सहा चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या असून त्यांची अंदाजे किंमत २ लाख २० हजार रुपये आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यातील गु.र.नं. 132/2026 व 324/2025 तसेच गंगाखेड पोलीस ठाणे, जि. परभणी येथील गु.र.नं. 29/2026, कलम 303(2) भारतीय न्याय संहिता अंतर्गत दाखल वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू होता. तपासादरम्यान पोलिसांनी संतोष बाबासाहेब मुंडे (वय २५, रा. वरवटी ता. अंबाजोगाई, ह.मु. छत्रपती कॉलनी, बायपास रोड, अंबाजोगाई शहर) यास ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीकडून विविध ठिकाणांहून चोरी केलेल्या एकूण सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या. यामध्ये हिरो HF डिलक्स, होंडा अॅक्टिवा, हिरो पॅशन प्रो, हिरो स्प्लेंडर प्रो तसेच टीव्हीएस ज्युपिटर आदी वाहनांचा समावेश असून जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे २.२० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुशांत सुतळे, हेड कॉन्स्टेबल मारुती कांबळे, रामचंद्र केकान, विष्णू सानप, एनपीसी गोविंद भताने आणि पोलीस कॉन्स्टेबल सचिन आंधळे यांनी पार पाडली.







