ब्रेकिंग न्यूज

जिल्हाधिकाऱ्याने दणका दिलाच!राक्षसभुवन रेती घाट प्रकरणात 19 जणांवर गुन्हा दाखल.

महसूल कर्मचाऱ्यांसह कोणत्या खाजगी व्यक्तींचा समावेश बातमी वाचा.

गेवराई, दि. 16 – गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन रेती घाटातील कथित अवैध रेती उत्खनन, वाहतूक आणि घरकुल लाभार्थ्यांच्या नावावर झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली असून महसूल विभागातील कर्मचाऱ्यांसह 19 जणांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी नायब तहसीलदार संजय दत्तात्रय सोनवणे (महसूल-2), तहसील कार्यालय गेवराई यांनी फिर्याद दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गठीत चौकशी समितीच्या अहवालात दोषी आढळल्याने हा गुन्हा नोंद करण्यात आला.

या प्रकरणात ग्राम महसूल अधिकारी गोविंद ढाकणे, किरण दांडगे, खाजगी संगणक चालक विश्वजीत शेंबडे पाटील, महसूल सेवक शुभम गायकवाड यांच्यासह गोविंद दिलीप मगर, योगेश दिलीप मगर, अशोक चवकर, गंगावाडीचे उपसरपंच मुकेश उद्धव बोराडे, दादासाहेब रमेश माळी, यासीन तांबोळी, अमोल अप्पासाहेब लाखे, सामाजिक कार्यकर्ता शितल शिवाजी धोंडरे, बेलगुडवाडीचे सरपंच भागवत राधाकिसन जाधव, कल्याण पवार (पोलीस), के. एम. पवार, सोहेल सोदागर, शाहरुख मुसा पठाण, ग्रामपंचायत सेवक अजय चाळक आणि बाबासाहेब तुकाराम सांगळे यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2025 पासून राक्षसभुवन घाटातून मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उत्खनन व वाहतूक करण्यात आली. तसेच घरकुल लाभार्थ्यांच्या नावाचा वापर करून शासकीय खनिज संपत्तीची चोरी, डिजिटल डेटामध्ये छेडछाड करून फसवणूक, गोदावरी नदीपात्राचे पर्यावरणीय नुकसान व विद्रुपीकरण, तसेच शासकीय यंत्रणेची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गु.र.नं. 199/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS), आयटी अ‍ॅक्ट, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 आणि लोकसंपत्ती नुकसान निवारण कायदा 1984 अंतर्गत विविध गंभीर कलमे लावण्यात आली आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button