भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवर हल्ला,नागरिकांत भीतीचे वातावरण.
भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त नगरपालिका कधी करणार?

बीड ( प्रतिनिधी)बीड शहरात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव गंभीर बनत असून मागिल काही महिन्यात मोकाट कुत्र्याने बालकांवर, नागरिकांवर हल्ले केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.,यावर बीड नगरपालिका कडून कोणतीही उपाययोजना करण्यात येत नसल्याने नागरिकात संताप व्यक्त होत आहे.
याचाच प्रत्यय गुरुवारी (दि. 16 एप्रिल) सायंकाळी एकता नगर येथे आला. आणू जावळे नावाच्या लहान मुलीवर मोकाट कुत्र्याने अचानक हल्ला चढवला. या घटनेत ती जखमी झाली असून तिला तत्काळ बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहेत.
सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास संबंधित मुलगी घराबाहेर खेळत असताना भटक्या कुत्र्याने तिच्यावर झडप घातली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बीड शहरात मागील काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला असून, अनेक बालकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना समोर येत आहेत. नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही नगरपालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
दिवशी दिवस भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वाढ होत असून या पार्श्वभूमीवर, मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षेची हमी द्यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.










