बीड मध्ये गुटखा विक्रीवर बीड शहर पोलिसांची मोठी कारवाई.
शहरात पाच ठिकाणी छापे,साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त.

बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध गुटखा विक्रीविरोधात बीड शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत पाच ठिकाणी छापे टाकून सुमारे ₹8.50 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली गुटखा विक्री प्रतिबंधासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जनजागृती करूनही काही ठिकाणी गुटखा विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर 15 व 16 एप्रिल रोजी बीड शहर पोलीसांनी एकाच वेळी विविध ठिकाणी छापेमारी केली.
या कारवाईत नामदार मोहिदीन शेख, समशेर खान मुस्तफा खान, मोमीन अब्दुल मुजिब, अफरोज यासीन तांबोळी आणि लक्ष्मण दत्तूबा वाघुले यांच्याकडून गुटखा साठा जप्त करण्यात आला. वाघुले याच्या ताब्यातील कारमधूनही मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला.
छापेमारीदरम्यान विविध कंपनींचा गुटखा, पान मसाला, मोबाईल फोन तसेच वाहन असा एकूण साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 0081/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता, 2023 च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व पोलीस उपाधीक्षक वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव व त्यांच्या पथकाने केली.
दरम्यान, पोलिसांनी शहरातील टपरी चालक व किराणा दुकानदारांना इशारा देत गुटखा विक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.










