गेवराईत अवैध मावा कारखान्यावर पोलिसांची धाड.
2 लाख 12 हजाराचा मुद्देमाल जप्त;गेवराई पोलीस व अन्नसुरक्षा अधिकारी यांची संयुक्त कारवाई.

बीड( प्रतिनिधी)बीड राज्य सरकारने गुटखा व तंबाखूजन्य पदार्थावर बंदी केली असताना देखील बीड जिल्ह्यात मात्र गुटखा राजरोस विक्री केली जात असल्याचे चित्र दिसत आहे.
बीड जिल्ह्यात गुटखा साठवण व विक्री करणारावर पोलिसाकडून कारवाईचा फास आवळला जात असून गुटखा माफीयावर पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.
बीड जिल्ह्यात अवैध गुटखा व मावा विक्रीवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत गेवराई पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरातील एका ठिकाणी चालू असलेला मावा तयार करण्याचा कारखाना उध्वस्त केला. या कारवाईत सुमारे 2 लाख 12 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
बीड पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशानुसार जिल्हाभर अवैध गुटखा विक्रीविरोधात कारवाई सुरू आहे. त्याच अनुषंगाने 18 एप्रिल 2026 रोजी गेवराई पोलीस स्टेशनच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, जावेद निजाम शेख (वय 38, रा. संजयनगर, गेवराई) हा आपल्या घरासमोरील खोलीत सुगंधित तंबाखूपासून मानवी आरोग्यास अपायकारक असा मावा तयार करून विक्री करत आहे.
मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ छापा टाकत आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर पत्र्याच्या शेडजवळील खोलीची झडती घेतली असता प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, सुपारी व इतर घटकांचे मिश्रण करून तयार केलेला मावा, मिक्सर मशीन, मावा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी लोखंडी मोठी यंत्रणा आणि इतर साहित्य असा एकूण 2,12,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई एफएसएल पथकाच्या उपस्थितीत करण्यात आली. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी अजय गाढे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 तसेच भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय उदगिरकर करीत आहेत.हे करत आहेत.
ही कारवाई मा.पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके, पोलीस निरीक्षक किशोर पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि राम खोत, पोउपनि/संजय उदगिरकर, पोह/कल्याण राठोड, पोह/गणेश घोलप, पोह/अशोक हंबर्डे, पोशि/गोरख डोके, पोशि/जितेंद्र ओव्हाळ, मपोशि/कोंता शेळके तसेच अन्न सुरक्षा अधिकारी बीड अजय गाढे यांनी केली.
गुटखा साठवण व विक्री करणारावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा अन्नसुरक्षा अधिकारी यांनी दिला आहे.










