ब्रेकिंग न्यूज

गायराण जमिनीच्या वादातून खून.

आरोपींना अवघ्या ६ तासांत अटक.

बीड (प्रतिनिधी) – गायराण जमिनीच्या बांधावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीचा खून झाल्याची धक्कादायक घटना गेवराई तालुक्यात उघडकीस आली असून, या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी अवघ्या सहा तासांत अटक करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पपेश उर्फ गुड्डया अर्जुन माळी (वय ३१, रा. रामनगर तांडा, ता. गेवराई) यांनी १२ एप्रिल रोजी गेवराई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. ११ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास त्यांचे वडील अर्जुन साहेबराव माळी हे गोंडगाव शिवारातील गायराण जमिनीची पाहणी करण्यासाठी गेले असता, बांध कोरण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीमध्ये झाले.

या मारहाणीत आरोपी मधुकर नायबा शिंदे, मनोहर मधुकर शिंदे आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाने अर्जुन माळी यांना गंभीर मारहाण केली. जखमी अवस्थेत त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी बोड येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१७/२०२६ अन्वये भा.न्या. संहितेच्या कलम १०३(१), ३५२, ३(५) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब पवार करीत आहेत.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींच्या शोधासाठी विविध पथके छत्रपती संभाजीनगर, जालना व धाराशिव जिल्ह्यांत रवाना करण्यात आली. आरोपींनी मोबाईल बंद करून लपण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गोपनीय माहितीच्या आधारे ते बीड शहरातील बार्शीनाका परिसरात असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार पोलिस पथकाने तातडीने कारवाई करत आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना शिताफीने ताब्यात घेतले व गेवराई पोलीस ठाण्यात आणून अटक केली. ही संपूर्ण कारवाई अवघ्या सहा तासांत पूर्ण करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवीनत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या नेतृत्वात पार पडली. तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button