डोंबरी गावात डॉ.आंबेडकर जयंती मिरवणुकीत गावगुंडांचा गोंधळ.
मिरवणूक रथ आडवून दगडफेक व मारहाणीने गावात तणाव.गावकऱ्यांनी घेतली पोलीस अ.पो.अधीक्षकांची भेट.

बीड (प्रतिनिधी) पाटोदा तालुक्यातील डोंबरी गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकी दरम्यान गावातील काही गावगुंडांनी गोंधळ घालत दगडफेक व मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकारामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 29 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास जयंतीची मिरवणूक निघाली होती. यावेळी आंबेडकर जयंतीचा रथ गावातील काही गावगुंडांनी अडवून अचानक दगडफेक सुरू केली. या गोंधळात महिला व मुलांनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
तसेच जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या भोजनावरही संबंधितांनी माती फेकल्याने संताप व्यक्त होत आहे. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. जयंती मिरवणुकीत पोलीस कर्मचारी,अधिकारी उपस्थित नसल्यानेच मारहाण व गोंधळ झाल्याचा आरोप देखील गावकऱ्यांनी केला आहे
दरम्यान, आज दिनांक 30 एप्रिल रोजी सकाळी डोंगरी गावातील ग्रामस्थांनी थेट बीड येथील पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून तक्रार नोंदवली. अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी महिलांसह ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून घेत संबंधितांवर बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणी पुढील कारवाई सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.





