ब्रेकिंग न्यूज

 १ मे महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या गाडीवर टमाटे फेकण्याचा इशारा.

अल्पवयीन मुलगी पळविण्या प्रकरणी नेकनूर पोलिसांवर गंभीर आरोप.

बीड (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील नेकनुर पोलीस ठाण्याच्या कार्यप्रणालीवर मागील काही महिन्यापासून गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. मागील महिन्यातच फिर्याद दाखल करण्यासाठी गेलेल्याना मारहाण केल्याचा आरोप नेकनूर पोलिसावर करण्यात आला होता तसेच पत्रकारावर देखील गुन्हा दाखल झाला होता यामुळे नेकनूर पोलीस ठाणे चर्चेचा विषय बनला होता.

यातच आता धक्कादायक तक्रार समोर आली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पैशाच्या जोरावर पाठीशी घातल्याचा आरोप पीडितेच्या आईने केला आहे.

कानडीघाट (ता.जि. बीड) येथील रहिवासी सोनाली नितीन माटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे की, त्यांच्या १४ वर्षांच्या मुलीला आरोपी सुरज पंजाब झोडगे याने फूस लावून पळवून नेले. या घटनेला तब्बल दोन महिने उलटून गेले असून, दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी नेकनुर पोलीस ठाण्यात एफआयआर (क्र. 0054/26) दाखल करण्यात आला आहे.

तथापि, अद्याप आरोपीचा शोध लागलेला नसल्याने आणि मुलगी परत न मिळाल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून पोलिसांच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे. तक्रारीत पुढे असा आरोप करण्यात आला आहे की, पोलीस ठाण्यातील मुख्य फौजदार चंद्रकांत गोसावी व जमादार सचीन मुरूमकर यांनी आरोपीच्या नातेवाईकांकडून पैसे घेत आरोपीला संरक्षण दिले आहे.

 एक मे महाराष्ट्र दिन असल्याने बीडच्या पालकमंत्री सुमित्राताई पवार या झेंडा वंदन करण्यासाठी येणार असून या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांच्या वाहनावर सडके टमाटे फेकण्याचा इशारा दिला आहे. “भ्रष्ट पोलिस यंत्रणेला जागे करण्यासाठी आणि माझी मुलगी परत मिळवण्यासाठी हा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागत आहे,” असे अर्जात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणाची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक (अंबाजोगाई), पोलीस उपअधीक्षक (केज) तसेच तहसीलदार बीड यांनाही देण्यात आली आहे.

या गंभीर आरोपांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर तातडीने चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button