नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची चार लाखांची फसवणूक
जिल्हाधिकाऱ्यांचे नाव पुढे करून उकळली रक्कम; गुन्हा दाखल होताच महिला पसार.

अंबाजोगाई : जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका २४ वर्षीय सुशिक्षित बेरोजगार तरुणाची चार लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना अंबाजोगाईत उघडकीस आली आहे. या प्रकरणी काजल देविदास भट्ट हिच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी ओमकार संतोष शिंदे (रा. अमृतेश्वरनगर, अंबाजोगाई) हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असून, आरोपी महिला त्यांच्या नातेवाईकांच्या परिचयातील होती. तिने स्वतःला महसूल विभागातील अधिकारी असल्याचे सांगून बीड जिल्हाधिकारी कार्यालयात वैयक्तिक सहाय्यक (पीए) पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतील, असे सांगत रोख व ऑनलाईन माध्यमातून एकूण चार लाख रुपये घेतले.
दरम्यान, आरोपीने व्हॉट्सॲपवर नियुक्ती आदेश पाठवला. मात्र त्यावर अधिकृत शिक्का नसल्याने व जॉईनिंग तारीख संशयास्पद वाटल्याने फसवणुकीचा प्रकार उघड झाला. पोलिसात तक्रारीची भीती दाखवल्यानंतर महिलेने एक लाख रुपये परत केले, मात्र उर्वरित रक्कम न देता ती पसार झाली.
या प्रकरणी पोलिसांनी बीएनएस कलम ३१८(४) व ३१९(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.






