१० हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात.
पोलीस दलात खळबळ;अपघात विम्याच्या कागदपत्रांसाठी लाच घेताना रंगेहात पकडले.जालना एसीबीची कारवाई,

बीड (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यामध्ये मागील काही महिन्यात लाचखोरच्या प्रमाणात वाढ झाली असून त्यावर लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडून कारवाईचा फास देखील आवळण्यात आल्याचे दिसत आहे. तरीदेखील जिल्ह्यात लाचखोरीच्या प्रमाण काही कमी होताना दिसत नाही.
नेकनूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदार बळवंत यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शनिवारी (दि. ६) दुपारी रंगेहाथ पकडले. ही कारवाई नेकनूर पोलीस ठाण्याच्या आवारात करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील येळंब येथील एका व्यक्तीचा अपघात झाला होता. उपचारादरम्यान संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला. मयताच्या मुलाने अपघात विम्याचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची मागणी अंमलदार बळवंत कदम यांच्याकडे केली होती. त्यावेळी कागदपत्रे देण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराने याबाबत जालना एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. उपअधीक्षक बाळासाहेब जाधवर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने नेकनूर पोलीस ठाण्याच्या परिसरात कारवाई करत बळवंत यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
या कारवाईनंतर संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.
दरम्यान, बळवंत हे यापूर्वीही वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. काही महिन्यांपूर्वी शेतीच्या वादातून एका व्यक्तीला धमकी दिल्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या घटनेनंतर त्यांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. आता लाचखोरी प्रकरणात झालेल्या कारवाईमुळे नेकनूर पोलीस ठाणे पुन्हा चर्चेत आले आहे.
ही कारवाई जालना लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे डीवायएसपी जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.










