अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची बदली
शांत,संयमी व नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यात यश अशी ओळख.

बीड जिल्ह्यातील कार्यकाळात गुन्हेगारीविरोधात प्रभावी मोहिमा; नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यात यश.
बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले सचिन पांडकर यांची शासनाने धाराशिव येथे बदली केली आहे. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ही बदली करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, त्यांच्या बदलीमुळे पोलीस विभागात तसेच जिल्ह्यातील विविध स्तरातून मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
सचिन पांडकर यांनी बीड जिल्ह्यात काम करताना शांत, संयमी आणि अभ्यासू अधिकारी अशी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. कायदा व सुव्यवस्था राखताना त्यांनी कठोर निर्णय घेण्यास मागेपुढे पाहिले नाही, तर दुसरीकडे सामान्य नागरिकांशी संवाद साधत विश्वासाचे वातावरणही निर्माण केले.
त्यांच्या कार्यकाळात अनेक संवेदनशील गुन्ह्यांचा तपास वेगाने पूर्ण करण्यात आला. जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. अवैध धंदे, गुंडगिरी, शस्त्र कारवाया तसेच संघटित गुन्हेगारीविरोधात त्यांनी धडक कारवाई करत पोलीस प्रशासन अधिक सक्रिय केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
विशेष म्हणजे, कोणतीही परिस्थिती असो, संयम न सोडता काम करण्याची त्यांची शैली अनेकदा चर्चेत राहिली. आंदोलने, तणावपूर्ण परिस्थिती किंवा मोठे गुन्हे उघडकीस आल्यानंतरही त्यांनी समन्वय आणि नियोजनाच्या बळावर परिस्थिती नियंत्रणात ठेवली. तसेच सार्वजनिक जयंती मिरवणुका मध्ये व मोर्चे यात त्यांनी बंदोबस्त पार पाडून नागरिकात विश्वास निर्माण केला होता त्यामुळे पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली होती.
दरम्यान, त्यांच्या बदलीची माहिती समोर आल्यानंतर अनेक सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय स्तरातून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत. धाराशिव येथे ते लवकरच पदभार स्वीकारणार असल्याचे समजते.
सध्या बीडच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदावर कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, शासनाकडून पुढील दोन दिवसांत नवीन अधिकारी नियुक्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.











