मारहाणीत तरुणाचा मृत्यू.
तीन ताब्यात; गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार.

बीड प्रतिनिधी बीड (शिरूर कासार)बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पाडळी येथे गायरान जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, मृताच्या नातेवाईकांनी गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाडळी येथील शंकर अश्रू बर्डे (वय 36) यांना गायरान जमिनीच्या वादातून गावातील काही व्यक्तींनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. प्राथमिक उपचारासाठी त्यांना रायमोहा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी बीड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असताना शनिवारी (दि. 16 मे) त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर बर्डे यांच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी जोपर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे रुग्णालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या प्रकरणात बीड स्थानिक गुन्हे शाखेने तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. मारहाणीच्या घटनेत सुमारे 20 ते 25 जण सहभागी असल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.











