ब्रेकिंग न्यूज

भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू.

कार व दुचाकीची समोरासमोर धडक;लिंबागणेशच्या राष्ट्रीय महामार्गावर मृत्यूचा सापळा.

लिंबागणेश(दि.१६ ):बीड तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी अहिल्यानगर–अहमदपूर मार्गावरील लिंबागणेश येथे शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात घडून दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. भालचंद्र विद्यालय परिसरात कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार दि. १५ मे रोजी रात्री पाऊणे बारा वाजण्याच्या सुमारास टाटा कंपनीची विस्टा कार (क्र. एमएच ०५ एएक्स ०३८८) आणि हिरो स्प्लेंडर दुचाकी (क्र. एमएच ४४ एए ६२२६) यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. अपघात इतका गंभीर होता की दुचाकीवरील दोन्ही प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. धडकेनंतर दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. नेकनूर पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार विठ्ठल राठोड व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालय, बीड येथे हलविण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले.

या अपघातात मृत्यूमुखी पडलेले दुचाकीस्वार बबन काशिनाथ लगास आणि ज्ञानदेव विष्णू लगास (दोघे रा. चिखलबीड, ता. जि. बीड) असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी वर लिंबागणेश परिसरात वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेषतः भालचंद्र विद्यालय परिसरात वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने हा परिसर अपघातप्रवण बनला आहे. येथे तातडीने गतिरोधक बसविणे, वेगमर्यादा फलक उभारणे, रात्रीच्या वेळी प्रकाशव्यवस्था सुधारणे तसेच वाहतूक नियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button