ब्रेकिंग न्यूज

दूध व दूधजन्य पदार्थात भेसळखोरावर कठोर कारवाई करा.

अन्यथा मनसेचे स्टिंग ऑपरेशन – सोमेश्वर कदम

दूध,तेल,तूप,बेकरी,स्वीट होम,चायनीज गाडे व जार प्लांटची संयुक्त तपासणी करण्याची मागणी

बीड( प्रतिनिधी)बीड शहरासह जिल्ह्यात भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांची विक्री वाढत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव सोमेश्वर राजकुमार कदम यांनी जिल्हा प्रशासन व अन्न व औषध प्रशासनाकडे निवेदन देऊन भेसळखोरांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

कदम यांनी दिलेल्या निवेदनात स्वीट होम, बेकरी,दूध डेअरी,लस्सी व आइसक्रिम विक्रेते, हॉटेल्स,बेकरी,चायनीज गाडे, फरसाण दुकाने, पेढा, सोनपापडी व चिक्की उत्पादक, पावभाजी सेंटर,धाबे, फळ विक्रेते तसेच पॅकेज्ड पिण्याचे पाणी (जार प्लांट) उत्पादक यांची संयुक्त तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच रसायनांचा वापर करून कृत्रिमरीत्या पिकवलेल्या आंब्यांसह इतर फळांच्या विक्रीवरही लक्ष ठेवण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यात विशेषतः पनीर,दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा प्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी, त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

संघटित पद्धतीने भेसळ करणाऱ्या टोळ्यांविरोधात मकोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा, असेही कदम यांनी नमूद केले आहे. सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही दया न दाखवता प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनतेच्या सहभागातून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन जिल्हाभर विशेष तपासणी मोहीम राबवावी, अन्यथा मनसेकडून स्वतंत्र स्टिंग ऑपरेशन करून भेसळखोरांचा भांडाफोड करण्यात येईल, असा इशाराही सोमेश्वर कदम यांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासन या मागण्यांवर कोणती भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button