ब्रेकिंग न्यूज

जिल्हा रुग्णालयात गुटखा खाणाऱ्यांवर कारवाई.

जागेवर 200 रुपये दंड वसूल;गुटखा खिशात,दंड निश्चित.

बीड(प्रतिनिधी)बीड जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात गुटखा खाणारे तसेच गुटखा व तत्सम तंबाखूजन्य पदार्थ सोबत बाळगणाऱ्या व्यक्तींविरोधात अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई सुरू केली आहे. रुग्णालय परिसरात गुटखा सेवन करताना आढळलेल्या व्यक्तींवर जागेवरच आर्थिक दंड आकारण्यात येत असून संबंधितांना लेखी नोटीसही देण्यात येत आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानंतर ही मोहीम अधिक कठोर करण्यात आली असून रुग्णालयात येणाऱ्या नातेवाईक व अभ्यागतांची तपासणी केली जात आहे. तपासणीदरम्यान खिशात गुटखा अथवा इतर तंबाखूजन्य पदार्थ आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येत आहे. काही प्रकरणांमध्ये २०० रुपयांचा दंडही आकारण्यात आला. जिल्हा रुग्णालयात ऍडमिट असलेल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी येणाऱ्यांनी रुग्णालयाच्या गेट बाहेरच तंबाखू गुटखा फेकून देण्यात आला यामुळे या तपासणी व कारवाईची चर्चा दिवसभर रंगली होती.

रुग्णालय परिसरात गुटखा खाऊन थुंकण्याच्या प्रकारांमुळे अस्वच्छता वाढत होती. तसेच संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईमुळे रुग्णालय परिसर स्वच्छ राहण्यास मदत होणार असून सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यापुढे बीड जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांना भेटण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींनी गुटखा किंवा तत्सम पदार्थांचे सेवन करून अथवा ते सोबत बाळगून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

रुग्णालय परिसरातील स्वच्छता आणि आरोग्यदायी वातावरण राखण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत असून राज्यातील इतर शासकीय रुग्णालयांतही अशीच मोहीम राबविण्याची मागणी पुढे येत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button