बीड शहाराजवळ पुन्हा लूटमार.
दुचाकी,आयफोन व रोख रक्कम लंपास; पुन्हा लुटारूची टोळी सक्रिय ?

बीड, दि. 17 (प्रतिनिधी) – बीड-परळी मार्गावरील बीड शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर, मोची पिंपळगाव फाट्याजवळ पांगरबावडी शिवारातील इंडियन पेट्रोलपंपासमोर एका तरुणाची मोटारसायकल, महागडा मोबाईल आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
ढेकणमोहा येथील रहिवासी रोहित बाबासाहेब शिंदे (वय 24) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते 16 जून रोजी रात्री 10 ते 11 वाजण्याच्या सुमारास बीडहून गावाकडे (ढेकणमोहा) मोटारसायकलवरून जात होते. पांगरबावडी शिवारातील इंडियन पेट्रोलपंपासमोर त्यांनी लघुशंकेसाठी आपली हिरो होंडा शाईन (एमएच-23 बीई 0522) ही मोटारसायकल उभी केली. काही क्षणांसाठी बाजूला गेल्यानंतर दोन अज्ञात इसमांनी मोटारसायकल सुरू करून पळवून नेली. बाबासाहेब शिंदे हा विद्यार्थी बीड पोलीस भरतीचा सराव व शिकवणी क्लास करत असून रात्री उशिरा गावाकडे जात होता.
मोटारसायकलच्या हँडलला अडकवलेल्या कापडी पिशवीत ठेवलेला अंदाजे 35 हजार रुपये किमतीचा आयफोन 15 प्लस (ग्रीन) मोबाईल आणि 3 हजार रुपयांची रोख रक्कमही चोरट्यांनी लंपास केली. चोरीस गेलेल्या मालाची एकूण किंमत सुमारे 78 हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, मागील आठवड्यात सोलापूर-धुळे महामार्गावरील वडगाव फाट्यावर कारमधून प्रवास करणाऱ्या कुटुंबांना अडवून सोने, मोबाईल व रोख रक्कम लुटल्याची घटना घडली होती. या रॉबरी प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यानंतर आता रात्रीच्या वेळी झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बीड जिल्ह्यात एखादी चोरट्यांची किंवा लुटारूंची टोळी सक्रिय झाली आहे का?असा प्रश्न या घटनेनिमित्ताने उपस्थित होत आहे.मात्र या वाटमारीच्या प्रकारामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.यामुळे पोलिसांनी तात्काळ या टोळीचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
या प्रकरणी शिंदे याने बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस करीत आहेत.







