नगरसेविकाच्या पतीवर मध्यरात्री जिवघेणा हल्ला.
माझ्या विरोधात निवडणुकी का लढवली म्हणत माजी नगरसेवकांसह पाच जणांनी केला हल्ला तक्रार दाखल,

बीड (प्रतिनिधी)बीड शहरातील कबाड गल्ली परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका व्यापाऱ्यावर पाच जणांनी मिळून मारहाण केल्याची घटना घडली असून या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भाजपा नगरसेवविका पती सागर अरुणराव देशपांडे (वय 39, रा. कबाड गल्ली, बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची पत्नी भाग्यश्री देशपांडे या प्रभाग क्रमांक 07 मधून भाजपाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवून निवडून आल्या होत्या. त्याच प्रभागातील उमेदवार बाळु जाधव याने निवडणुकीतील पराभवाचा राग मनात धरून देशपांडे यांना वारंवार शिवीगाळ करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दि. 11 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री सुमारे 12.25 वाजण्याच्या सुमारास सागर देशपांडे हे आपल्या घरासमोरील रस्त्यावर फोनवर बोलत उभे असताना, बाळु जगन्नाथ जाधव, यशराज जाधव व त्यांच्या सोबत असलेल्या आणखी तीन अज्ञात इसमांनी त्यांचा रस्ता अडवला. “तू येथे का उभा आहेस” तसेच “तुझ्या पत्नीला आमच्या पॅनलविरुद्ध निवडणुकीत का उभे केले” असा जाब विचारत त्यांनी वाद घालत मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या वेळी आरोपींनी देशपांडे यांना लाथाबुक्यांनी छाती, पोट, डोके व डोळ्यावर मारहाण करून खाली पाडल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच “गल्लीत दिसू नकोस” असा दम देत जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
घटनेनंतर देशपांडे यांनी मित्र आकाश भोसले व शेख अजिज यांना बोलावून घेतले व पोलीसांना माहिती दिली. पोलिसांनी त्यांना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. उपचारानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन अधिकृत तक्रार नोंदवली आहे.
या प्रकरणी बाळु जगन्नाथ जाधव, यशराज जाधव व अन्य तीन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास बीड शहर पोलीस करत आहेत.
बीड शहरात जर नगरसेवक, व्यापारी सुरक्षित नसतील तर सर्वसामान्याचे काय असा प्रश्न पडला आहे. बीड शहर पोलिसांचा धाक गुन्हेगारावर कमी झाला आहे का असा देखील प्रश्न सर्वसामान्याला पडला आहे.






