पत्नीसह एकाच्या त्रासाला कंटाळून युवकाची विहिरीत उडी.
चिट्टी मध्ये पत्नी व एकाचे नाव; दोघांवर गुन्हा दाखल.

बीड(प्रतिनिधी)गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे एका युवकाने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत पत्नीसह एका व्यक्तीच्या सततच्या त्रासाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख केल्याने, या प्रकरणी दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दत्ता प्रल्हाद शिंदे (रा. सिरसदेवी, ता. गेवराई) यांनी ३ जुलै २०२६ रोजी शेतातील विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले. आत्महत्येपूर्वी त्यांनी स्वतःचा मोबाईल आणि हस्तलिखित चिठ्ठी विहिरीच्या कडेला ठेवली होती.
या चिठ्ठीत त्यांनी पत्नी मीरा दत्ता शिंदे आणि अंकुश वामन काळे यांच्याकडून सतत मानसिक त्रास होत असल्याने आपण आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
या घटनेनंतर मृताच्या वडिलांनी ४ जुलै रोजी तलवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मीरा दत्ता शिंदे आणि अंकुश वामन काळे यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक २१३/२०२६ अन्वये बीएनएस कलम १०८, ३५१(२) व ३(५) अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास तलवाडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक स्वप्नील कोळी करीत आहेत.









