गुटखा तस्कराला पोलिसांनी रंगेहात पकडले.
सात लाखांच्या मुद्देमालासह एक ताब्यात;पेठ बीड पोलिस व अन्न भेसळ अधिकाऱ्याची संयुक्त कारवाई.

बीड(प्रतिनिधी) दिनांक ५ जुलै रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बीड शहरात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांवर पेठ बीड पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तपणे मोठी कारवाई करत ₹7,08,400 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एक आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, गुटखा वाहतुकीसाठी वापरलेले वाहनही जप्त करण्यात आले आहे.
पेठ बीड पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सानप व त्यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, बार्शी नाका–सोलापूर महामार्गावरून एका पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी अर्टिगा (MH-12-WX-4853) वाहनातून प्रतिबंधित गुटखा वाहतूक होत आहे. त्यानुसार पोलिसांनी छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेसमोर सापळा रचून वाहन अडवले.
वाहनाची पंचांसमक्ष तपासणी केली असता, महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा व पानमसाला साठा आढळून आला. वाहनचालकाने आपले नाव विकास बबन जाधव (वय 32, रा. इमामपूर रोड, बीड) असे सांगितले. त्याला ताब्यात घेऊन वाहनासह पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी अजय भगवान गाढे यांच्या उपस्थितीत पंचांसमक्ष प्रतिबंधित अन्नपदार्थांची तपासणी करण्यात आली. तपासणीत ₹8,400 किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि अंदाजे ₹7 लाख किमतीचे वाहन असा एकूण ₹7,08,400 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या 16 जुलै 2025 च्या अधिसूचनेनुसार राज्यात गुटखा, पानमसाला व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन, साठा, वाहतूक आणि विक्रीवर बंदी आहे. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अजय गाडे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक बीड नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, पोलीस उपाधीक्षक वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पेड बीड पोलीस निरीक्षक निलेश केळे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक बारगळ,पो.सानप, पो. हजारें व अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांच्या समन्वयातून पार पडली असून, जिल्ह्यात प्रतिबंधित गुटख्याच्या अवैध विक्रीवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी माहिती दिली.









