धनंजय देशमुखवर हल्ल्याचा प्रयत्न;हॉटेलमध्ये पिस्टलचा धाक दाखऊन धमकावल्याचा खिंडकरचा आरोप.
धनंजय देशमुख/समाधान खिंडकर वाद पेटला ! परस्पर विरोधी गुन्हे दाखल.

बीड (प्रतिनिधी) मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराठी येथे भर उन्हात उपोषणास बसले होते. या उपोषणाला राज्यभरातून मराठा समाज बांधवांनी पाठिंबा दर्शविला होता. त्यामध्ये मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे देखील सहभागी झाले होते.
उपोषण रात्री उशिरा संपल्यानंतर धनंजय देशमुख हे गावाकडे परतत असताना बीड बायपास रोडवरील एका धाब्यावर जेवणासाठी थांबले. याच ठिकाणी समाधान खिंडकर व त्यांचे साथीदार आल्याने वाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे. मोबाईलवर व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न झाल्याने देशमुख व त्यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षक पोलिसांनी आक्षेप घेतल्याचे सांगितले जात आहे. याच कारणावरून दोघा मध्ये शाब्दिक वाद झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, बीड बायपास रोडवरील हॉटेलमध्ये झालेल्या या वादानंतर धनंजय देशमुख यांनी रात्री उशिरा समाधान खिंडकर व साथीदारावर हल्ल्याचा व धमकावल्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली त्यामुळे या प्रकरणाने बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे, धनंजय देशमुख यांचे साडू दादा खेडकर यांचे सख्खे बंधू समाधान खिंडकर असल्याचे समोर येत असून, कौटुंबिक नातेसंबंधांमुळे या प्रकरणाची चर्चा अधिक रंगली आहे.
ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, समाधान खिंडकर (वय ३०, रा. बेलवाडी) यांनी तक्रारीत म्हटले आहे की, ते मित्रांसह बीड बायपास रोडवरील हॉटेल शेतकरी राजा येथे जेवणासाठी गेले होते. यावेळी रिलस्टार रवीराज साबळे हे देखील तेथे उपस्थित होते.
फिर्यादीनुसार, इन्स्टाग्राम लाइव्ह सुरू असताना धनंजय देशमुख यांच्या अंगरक्षकाने मोबाईल हिसकावून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर धनंजय देशमुख यांनी अंगरक्षकाच्या कमरेतील पिस्टल काढून डोक्याला लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे. मात्र, उपस्थितांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 192/2026 अन्वये विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दुसरीकडे, धनंजय देशमुख यांनीही समाधान खिंडकर व त्यांच्या साथीदारांविरोधात हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार देत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या प्रकरणात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असून, सीसीटीव्ही फुटेज व पोलिस तपासातून नेमके सत्य काय समोर येते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दोन दिवसापूर्वीच दादा खिंडकर यांनी बंधू समाधान खिंडकर विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.मात्र ती तक्रार खोटी असल्याचा समाधान खिंडकर यांनी फेसबुकवर व्हिडीओ केला होता.











