

नाते काळवंडले! नेकनुरमध्ये अल्पवयीन नातीवर नराधम आजोबासह चुलत भावाचा अत्याचार, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात कौटुंबिक आणि रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक व धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ६० वर्षीय नराधम आजोबाने आणि पीडितेच्या चुलत भावाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी नेकनूर पोलिसांनी दोन्ही नराधमांविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला तातडीने जेरबंद केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या आजी-आजोबांकडे राहत होती, कारण तिचे आई-वडील कामासाठी बाहेरगावी गेले आहेत. शाळेला सुट्ट्या असल्याने आजी इतर भावंडांसह शेतात शेळ्या चारण्यासाठी गेली असता, घरी कोणी नसल्याची संधी साधून नराधम आजोबाने नातीवर बळजबरीने अत्याचार केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. काही दिवसांनी पीडितेच्या पोटात दुखू लागल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले, तिथे महिला डॉक्टरांनी विश्वासात घेतल्यानंतर पीडितेने हा भयानक प्रकार उघड केला. धक्कादायक बाब म्हणजे, पीडितेचा चुलत भाऊ देखील तिच्यावर आणि तिच्या लहान बहिणीवर शेतात व घरात अत्याचार करत असल्याचे तपासात समोर आले आहे. डॉक्टरांच्या माहितीनंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.






